Skip to main content

मंचरमध्ये उत्तम भाग्य ज्वेलर्सवर दरोडा

 मंचर प्रतिनिधी:



मंचरमध्ये (ता. आंबेगाव) उत्तम भाग्य ज्वेलर्सवर सात दरोडेखोरांनी ६.५० लाख रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना घडली आहे. या दरोडेखोरांनी दरोडा टाकून जाताना दुकान मालकाची आई, मुलगा, मुलीला बांधून ठेवून दमदाटी केली. पोलिसांनी व स्थानिकांनी तत्परता दाखवत घटनास्थळी येऊन ५ दरोडेखोरांना जेरबंद केले असून दोघे फरार झाले आहेत. ही घटना आज पहाटे २ ते ३ च्या सुमारास घडली आहे. दरम्यान जैना समदडिया या धाडसी मुलीने संबंधित हत्यारबंद दरोडेखोरांना प्रतिकार करत थोपविण्यासाठी प्रयत्न केल्याने तिचे कौतुक होत आहे.

मंचर शहराच्या बाजारपेठेत भरवस्तीत उत्तम भाग्य ज्वेलर्स हे सोन्या-चांदीचे दुकान आहे. मागील एक महिन्यापासून दरोडेखोरांनी या दुकानाची रेकी केली होती. संबंधित दरोडे खोरांना दोन स्थानिकांनी मदत करत सर्व माहिती पुरवली. मालक अभिजीत समदडिया हे रात्री दुसऱ्या दुसऱ्या मजल्यावर तर त्यांची आई ललिताबाई (वय ७५), मुलगा यश (वय २१), मुलगी जैना (वय १६) हे पहिल्या मजल्यावर झोपले होते. आज पहाटे २ च्या सुमारास ७ दरोडेखोर ड्रेनेजच्या पाईपवरून तीन मजली इमारतीवर चढले. इमारतीचा वरील दरवाजा तोडून जिन्याने ते खाली असलेल्या सोने-चांदीच्या दुकानात आले. दुकानाचे सायरन बंद करून सीसीटीव्ही कॅमेरा फिरवून त्यांनी आत प्रवेश केला.

उत्तमभाग्य ज्वेलर्स या दुकानातील १८ किलो ७१० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने तसेच २ लाख २२ हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज चोरट्यांनी लुटला. ऐवज घेऊन परत जाताना एका दरोडेखोराचा धक्का पहिल्या मजल्यावरील दरवाजाला लागला. आत झोपलेला यश याला वडील आले असावेत असे समजून त्याने दरवाजा उघडला. त्यावेळी हातात कोयता, कटावणी घेऊन दरोडेखोरांनी त्याच्यावर हल्ला चढविला. यश पळत आजीच्या खोलीत गेला. त्यावेळी झोपलेल्या जैनाकडे दरोडेखराने मोर्चा वळविला. जैनाने धाडस दाखवत एका दरडोखराला लाथ मारली. त्यावेळी दुसऱ्याने तिचे तोंड दाबले असता तिने त्याच्या हाताचा चावा घेतला. ललिता समदडिया यांना दमदाटी करत तुमच्या घरात रोख रक्कम आहे. आम्ही महिन्यापासून वॉच ठेवला आहे. आम्हाला लॉकरची चावी द्या असे दटावले. मात्र ललिताबाई यांनी त्यांना आपल्याकडे चावी नसल्याचे सांगितले. दरोडेखोरांनी तिघांना आतील रूममध्ये बांधून ठेवले. तसेच तेथील सोन्याचे दागिने ताब्यात घेतले.

या दरम्यान दुसऱ्या मजल्यावर झोपलेल्या अभिजीत समदडिया यांना झटापटीचा आवाज आला. त्यांनी मोबाईलमधील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यावेळी दोनजण घरामध्ये उचकापाचक करत असल्याचे दिसले. दुकानावर दरोडा पडल्याचे लक्षात येताच अभिजीत समदडिया यांनी गिरीश समदडिया, नीरज समदडिया, महावीर संचेती, अमोल पारेख यांना घटना कळविली.

दरम्यान पोलिसांना माहिती दिली असता जवळच रात्रगस्त घालत असलेले पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे पोलीस पथक घेऊन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांची चाहूल लागताच ५ दरोडेखोर ऐवज घेऊन शेजारच्या इमारतीच्या गच्चीवर गेले. तर २ चोरटे आलेल्या मार्गाने पळून गेले. बाजारपेठेतील नागरिक, काजीपुरा येथील तरुण तसेच परिसरातील महिला, पुरुष मोठ्या संख्येने मदतीसाठी येऊन परिसराला वेढा घातला. गिरीश समदडिया यांच्या इमारतीच्या गच्चीवर लपलेल्या ५ दरोडेखोरांना पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडे कोयता, कटावणी, गॅस कटर, गॅस गन व एक बनावट पिस्तूल मिळाले आहे.

वैभव बाळू रोकडे (वय २४ रा. नागाचा खडक मुरबाड), गणेश रामचंद्र टोके (वय २६ रा. नडे ता. मुरबाड), अजय सखाराम भिसे (वय २० रा. कलगाव ता. शहापूर) ग्यानसिंग भोला वर्मा (वय २३ रा. घोडबंदर रोड ठाणे) व मोहम्मद अरमान दर्जी (वय २३ रा. नेहरूनगर कुर्ला) यांना पोलिसांनी मुद्देमालासह पकडले आहे. तर इतर दोघे मुद्देमलासह फरार झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे. गिरीश समदडिया यांच्या इमारतीच्या गच्चीवर लपलेल्या ५ दरोडेखोरांना पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडे कोयता, कटावणी, गॅस कटर, गॅस गन व एक बनावट पिस्तूल मिळाले आहे.

अशी झाली चोरी (व्हिडिओ पाहण्यासाठी येथे टॅप करा)

दरम्यान खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी सकाळी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस पथकाच्या या कामगिरीबद्दल त्यांनी अभिनंदन केले आहे. पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे, पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे, पोलीस कर्मचारी तानाजी हगवणे, नंदकुमार आढारी, होमगार्ड फैजल खान, अर्जुन ठोंबरे यांनी ही कामगिरी केली आहे. यश व जैना समदडिया यांच्या धाडसाचे कौतुक केले जात आहे. यश याच्या हाताला करकचून बांधल्याने दुखापत झाली आहे. चोरटे सव्वा तास समदडिया यांच्या घरात ठाण मांडून होते. स्थानिक नागरिकांनी दाखवलेली तत्परता याबद्दल पोलिसांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत.



पॉप्युलर

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.