घोडेगाव प्रतिनिधी:
९ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिनानिमित्त स्वातंत्र्यानंतर ७५ वर्ष होऊनही मुलभूत सुविधा, राज्य घटनेने दिलेल्या अधिकारापासून वंचित राहुन आज शासनदरबारी दाद मागण्यासाठी घोडेगाव येथे घोडेगाव येथील तहसील कार्यालयावर मोर्चा चे आयोजन करून निवेदन देण्यात आले.
यावेळी जि.प.अध्यक्ष आदिवासी नेते देवराम लांडे,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी उपजिल्हासंघटक कलावती पोटकुले, तालुका संघटक प्रा.सुरेखा निघोट फासेपारधी समाजाचे नेते नामदेव भोसले ,महिपत भोसले, रेश्मा भोसले, कलावती भोसले,शारदा भोसले,चलाख भोसले, बलवार पवार, सचिन भोसले,चान्स भोसले फासेपारधी समाजा शिवसेना महिला आघाडीच्या रणरागिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना नामदेव भोसले यांनी फासेपारधी समाजाला, जातीचे दाखले मिळत नसल्याने उच्च शिक्षणापासून मुले वंचित रहात असुन शिष्यवृत्ती नसल्याने शाळा महाविद्यालयांचे महागडे शिक्षण परवडत नसल्याने शिक्षण सोडून द्यावे लागत असल्याने प्रगती खुंटली आहे, स्वातंत्र्य मिळुन ७५ वर्षे झाली तरी आजही हा समाज भौतिक सुविधांपासून वंचित असुन,झोपडी-पालात रहात आहे, वीजेची आरोग्य, दळणवळणाची आणि घरकुलासाठी जागा शासनाने द्यावी ,अशी मागणी करतानाच गुन्हेगारीचा शिक्का असल्यासारखे पोलिस त्रास देत असुन यातुन समाजाची सुटका करावी अशी मागणी केली.
यावेळी बोलताना देवराम लांडे यांनी शासनाने विकासापासून कोसोदुर असलेल्या अजुनही झोपडीत सर्व सोयींपासुन दूर असलेल्या फासेपारधी समाजाच्या घरकुल,जातीचा दाखला देण्यास अधिकारी वर्गाने प्राधान्यक्रम देऊन, समस्या सोडवाव्यात अन्यथा यापेक्षा ऊग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कलावती पोटकुले यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कायमच वंचित घटकांच्या मागे असुन समाजातील काळे हा युवक होमगार्ड, काही पोलिस म्हणूनही कार्यरत आहेत त्यासाठी प्रयत्न केले असे सांगितले
तर प्रा.सुरेखा निघोट यांनी शिवसेना पक्ष फासेपारधी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आज व इथून पुढेही रस्त्यावर उतरणार असुन या मागण्यांची शासनदरबारी दखल घेईपर्यंत बरोबरच रहाणार असे उपस्थित समाजास सांगुन शासनाने या पायाभूत सुविधांपासून वंचित समाजाच्या प्रगती, विकासासाठी योजनाबद्ध कार्यक्रम व निधी द्यावा व विशेष शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित करून सर्वांना रेशनकार्ड, आधार कार्ड,जातीचा दाखला, घरकुल व त्यासाठी जागेची मंजुरी देऊन,हातावर पोट असलेल्या लोकांना उपजिविकेचं साधन नसल्याने प्रशिक्षण व कर्ज रुपाने मदत करुन मुख्य प्रवाहात आणावे अशी मागणी केली.
याप्रसंगी फासेपारधी समाजाचे लोक, महिला लहान मुलांसह संपूर्ण आंबेगाव तालुका, पुणे जिल्ह्यातुन उपस्थित होते, शासनाने आमच्या मागण्यांची दखल घ्यावी अशी जोरदार घोषणाबाजी,या मोर्चात झाली.