शिरूर प्रतिनिधी:
आंबळे (ता. शिरूर) येथील सोनखिळा वस्ती येथे आज पहाटे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात कालवड जागेवरच ठार झाले. नवनाथ दादासाहेब बेंद्रे यांच्या मालकीचा गाईचा गोठा आहे. आज पहाटेच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात प्रवेश करून कालवडवर हल्ला केला. त्यामध्ये कालवड जाग्यावर ठार झाले. यादरम्यान कुत्रे भुंकल्याने बेंद्रे यांना जाग आली घरातून बाहेर येईपर्यंत बिबट्या पळून जात असल्याचे बेंद्रे यांना दिसून आले.
यामध्ये बेंद्रे यांचे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यापूर्वीही बेंद्रे यांच्या तीन पाळीव कुत्र्यांचा बिबट्याने फडशा पाडला आहे. आज तालुका वनक्षेत्रपाल मनोहर म्हसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष भुतेकर यांनी पंचनामा केला. शेतकऱ्यांना बिबट्याचे सातत्याने दर्शन होऊ लागल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे परिसरात वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी शिरूर तालुका ग्राहक संघटनेचे संघटक दिलीप बेंद्रे यांनी निवेदनाद्वारे वनविभागाकडे केली.