समर्थ भारत न्यूज नेटवर्क:
राजकारणातून लसीकरण शिबिरे आयोजित
करून समाजकारण होत असेल तर अशा या समाजकारणास सर्वांचा पाठींबा राहील. मात्र
एखाद्या क्षेत्रापुरतेच जर लसीकरण होणार असेल आणि अन्य भागात मात्र त्याचा फायदा
होणार नसेल तर हे त्या भागातील नागरिकांवर अन्याय म्हणावा लागेल. त्यामुळे ज्या
ठिकाणी राजकारणी लसीकरण शिबिरे आयोजित करून नागरिकांना फायदा करून देत असतील तर ते
चांगलेच आहे. मात्र हा सगळा प्रकार होत असताना तळागाळातील घटक लसीकरणापासून वंचित
राहणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे. काही बड्या उद्योगसमूहांनी सामाजिक
उत्तरदायित्व निधीतून काही ग्रामीण भागातील गावं दत्तक घेऊन लसीकरण मोहिमेस हातभार
लावण्याची गरज आहे. कारण आज सध्याच्या घडीला नागरिकांचे लसीकरण करणे आणि त्यांना
ह्या आजारापासून सुक्षित करणे हे एकमेव शस्त्र हातात आहे. त्याचा योग्य आणि
जितक्या लवकर उपयोग केला तर नक्कीच समाजाला याचा फायदाच होणार आहे.