Skip to main content

मराठी दिनाच्या अगणित शुभेच्छा

 समर्थ भारत न्युज नेटवर्क:






मॉलमध्ये गेल्यावर 'ये कितने का है ?' किंवा 'हाऊ मच इट कॉस्टस ?' असं विचारणा-या तमाम मराठी माणसांना मराठी भाषा दिनाच्या बळेच शुभेच्छा..आपली मुलं इंग्रजी शाळांत घालून इतरांच्या मुलांना मराठीतून शिकण्याचा आग्रह धरणा-या गुणीजनांनाही कोरडया शुभेच्छा. खरेदीस गेल्यावर मराठी दुकानदारासमोर इंग्रजीत बोलून पुन्हा आपसात मराठीत बोलणा-या मराठी दांपत्यास तर अनेकोत्तम शुभेच्छा. दूरध्वनीवरचे संभाषण अकारण हिंदी इंग्रजीतून झाडणा-या, आपला रुबाब वाढवण्यासाठी मराठी भाषेऐवजी इतर भाषांचा अंगीकार करणा-या लोकांना त्रिवार शुभेच्छा.. फेसबुकवर वाढदिवसाच्या दिवशी एचबीडी लिहिणा-या किंवा टीसी, जीएन, जीएम, जीई, जीए, हाय, हॅलो, बडी, ब्रो, ड्यूड, सिस, हे मॅन, अंकल, आंट, पापा, ममी, मॉम्झ, डॅड असलं अरबट चरबट लिहिणा-या लोकांनाही ओढून ताणून शुभेच्छा...

तसेच शब्दांचे मूळ रूप विद्रूप करून तै, बै, वेग्रे, लोक्स, कळतै, पैले असं पिळून काढलेलं स्वरूप देणाऱ्या प्रतिभावंतांनाही शुभेच्छा.. सोशल मीडियावर लेखन करताना दर वाक्यात इंग्रजी शब्द घुसडून लेखनाचे पुण्यकर्म करणा-या महालेखकांनाही सकळ शुभेच्छा. टॅक्सी, रिक्षा, बस, रेल्वे, विमान, जहाज यातून प्रवास करताना किंवा अगदी पायी चालतानाही आपण मराठीत बोललो तर आपल्या अंगावर ढेकणांचा वर्षाव होईल. असं समजणा-या भोळ्या भाबड्या मराठीप्रेमींनी काय घोडे मारलेय, त्यांनाही शुभेच्छा. सार्वजनिक ठिकाणी, समारंभ वा सोहळ्यात मराठीचा वापर केल्यास कमीपणा येतो असं समजणाऱ्या मराठीजणांना तर अत्यंत मनस्वी शुभेच्छा.

आपल्या समोरील माणूस मराठीत बोलतो. हे लक्षात आल्यावर अंगावर पाल पडल्यागत चेहरा करणा-या मराठी माणसासही खूप खूप शुभेच्छा. सरकारी कार्यालयात, कार्यप्रणालीत, कचे-यात, बँकेत किंवा अनाहूत स्थळी गेल्यावर समोरील माणूस ज्या भाषेत बोलतो त्याच भाषेत बोलताना मराठीचा किमान एका संधीसाठीही वापर न करणा-या मराठी माणसासही आभाळभर शुभेच्छा.

मराठी वर्तमानपत्र विकत न घेणा-या, वर्षभरात एकही मराठी पुस्तक विकत न घेणा-या, कधीही मराठी नाटक - चित्रपट न पाहणा-या, जाणीवपूर्वक मराठी वाहिन्या न पाहता इतर वाहिन्या पाहणा-या, कधीही मराठी गाणं न गुणगुणणा-या, मराठी नियतकालिकापासून दूर राहणा-या तमाम मराठी माणसांना मराठी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.. आपली स्वाक्षरी देवनागरीत करता न येणा-या, मराठी अंक लिहिण्यास असुलभता वाटणा-या, जाणीवपूर्वक चुकीचे उच्चार करणा-या सर्व मराठी भाषक जनतेस मराठी दिनाच्या अगणित शुभेच्छा.

मराठी मुळाक्षरे, बाराखडी, व्याकरण, गद्य, पद्य याबाबत मनात कमालीची रुक्षता असणा-या कथित साक्षर जनतेस मराठी दिनाच्या शुष्क शुभेच्छा.. मराठीत लेखन केलं जावं म्हणून वा मराठीत बोललं जावं म्हणून कधीही, कुठेही आग्रह न धरणा-या भेकड मराठी माणसालाही मराठी दिनाच्या शुभेच्छा... फक्त मराठी दिनापुरते मराठीचे तुणतुणे वाजवणा-या मराठी माणसास मराठी भाषा दिनाच्या जरतारी शुभेच्छा...

मराठी दिनाचे ढोंग न करता आयुष्यभर मराठीवर प्रेम करणा-या खऱ्याखुऱ्या मराठी माणसास मात्र, मराठी दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा... अशुद्ध उच्चार करणाऱ्या, अशुद्ध लिहिणाऱ्या लोकांना सातत्याने झोडपून काढलं तर आपलं मराठीप्रेम सार्थकी लागतं असं काहींना वाटतं त्यांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा. मराठी जगवण्यासाठीची उर्मी केवळ भाषाशुद्धतेचा व विक्षिप्त उच्चारकाठिण्य असणाऱ्या दुर्बोध शासकीय वापरातल्या शब्दांचा दैनंदिन जीवनात वापराचा आग्रह धरून टिकवता येणार नाही हे वास्तव स्वीकारायला हवं. अनेक तद्दन जडशीळ, अगम्य, दुर्बोध, बोजड शब्द वापरण्याचा हेकेखोरपणा बंद करून रोजच्या जीवनातले सुलभ आणि अर्थवाही शब्द वापरण्यासाठी आग्रही राहिलं तर अधिक भलं होईल.

मराठी भाषा ही केवळ लिहिण्या, वाचण्या, बोलण्या पुरती नसून ती जगण्याची आसक्ती आहे. ज्या दिवशी कळेल तो सुदिनच म्हणावा लागेल. जीवावर येऊन मराठीत वाचत, बोलत, लिहित नसलो तर आज शुभेच्छा देण्याघेण्यात काही हशील नाही. केवळ औपचारिकता म्हणून, विचार आवडले म्हणून, प्रघात म्हणून किंवा आपणही मराठीवर प्रेम करतो हे दाखवून देण्यासाठी हा शुभेच्छा देण्यात काय अर्थ आहे ? मराठीचं जगणं म्हणजे आपल्या प्रकटनाचं, आपल्या अनुभूतीचं जगणं !

पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

वळतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  वळती (विनायक लोंढे) ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वळती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर विजयाची गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' ह्या घोषणा देऊन मान वंदना देण्यात आली. महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्रिवार वंदन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्षे आहे. ह्या ऐतिहासिक दिनानिम्मित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, ग्रामसेविका ज्योती वेताळ, मा. सरपंच वामन वाळुंज, कार्यकारी सोसायटीचे मा. अध्यक्ष गणपत लोंढे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक निलेश भोर, मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीराजे भोर, उद्योजक ...

चास नारोडी परिसरात विजेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे वर बोट

समर्थ भारत वृत्तसेवा घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात  महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत. विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल...